Official Website of Marathi Best Selling Author


माझं दानपात्र …
माझ्या मनात काय चाललंय हे जाणून कुणाला काय फरक पडतो? आणि हे पुस्तक वाचूनही काय फरक पडतो? तंत्रज्ञान एवढ्या झपाट्याने विकसित होत असताना कुठल्या तरी गोष्टीवर मी पाच मिनिटाच्यावर लक्ष दिल्याचं मला आठवत नाही. पाच दहा ओळींपेक्षा मोठा मेसेज मी वाचत नाही आणि असल्या व्यक्तीने सातत्याने चार पाच वर्ष प्रयत्न करून चक्क एक पुस्तक लिहावे हे थोडंसं जडच होतंय, नाही का? तर ह्या सगळ्या उलाढालीचा शेवटचा टप्पा जवळ येताच हे सगळं मी का केलं असा प्रश्न पडणं साहजिकच होत. मी एकतर कुणी साहित्यिक नाही तर फक्त एक क्षुद्र याचक आहे. मराठी साहित्यानं मला आतापर्यंत बरच काही दिल. त्या सगळ्या उपकारांची फेड तर काही होणार नाही. आयुष्याच्या अनेक वळणांवर भिकारडा मी माझं दानपात्र घेऊन साहित्याच्या दारी येत राहिलो आणि त्या माऊलीने माझी कधी निराशा केली नाही. अगदी सढळ हाताने माझ्या पात्रात शिधा पडतच राहिली आणि त्याच्याच जोरावर माझं व्यक्तिमत्व घडत राहील. हा माझा प्रयत्न दुसरं तिसरं काही नसून तर फक्त त्या मातेचे पांग फेडण्याचा एक निरागस प्रकल्प आहे.
ह्या कथा रचनेच्या काळात मी बऱ्याच चढउतारात गेलो. मी एकाचा दोन झालो, मी माझी पहिली गाडी विकत घेतली, मी माझं पाहिलं घर विकत घेतलं, मी चार वेळा बेरोजगार झालो, मी बाप झालो, माझे बाबा दीर्घ आजाराने गेले. असे अनेक सुखदुःखाचे क्षण एकामागून येत राहिले आणि प्रत्येक वेळी मी लिखाणाच्या शरणार्थ जात राहिलो. ह्या कथेत साकारलेलं विश्व माझं घरकुल कधी बनलं हे मला समजलं देखील नाही.
माझी तुम्हा वाचकांकडून काही एक अपेक्षा नाही. फक्त एवढी आशा आहे कि त्यांनी मराठी साहित्याची ज्वाळा धगधगत ठेवावी. जेव्हा माझी प्रिय मातृभाषा हळूहळू आचके खाताना दिसते, जेव्हा तिची लिपी इंग्रजी होते तेव्हा मला तिच्या भवितव्याची चिंता वाटते. मी माझ्या परीने तिची ज्योत माझ्या घरात तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन. या छोट्याश्या प्रयत्नात एकाचे दोन, दोनाचे चार आणि चाराचे आठ झाले यातच काय ते आपल्या सगळ्यांचं यश. ज्या डवरलेल्या झाडाच्या सावलीत आपण आतापर्यंत विसावा घेत आलो आहोत त्या बहरलेल्या वृक्षाची फळे आपल्या पुढच्या पिढीनेही चाखावीत ह्याचंच काय मी ते दान मागतो.
